अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा प्रकाश थर
रंगीत ज्योतींचे दीपक होते या कंगणी कंगणी वर
मौनाचे मोहन घालून थांबला एकच निमीष वारा
झंकार करत उअठल्या नंतर वीणेच्या कोमल तारा
इतर गणिका नाचल्या भोवती एकेक मोहक होती
झळक देवून हालले तालात सांजांचे माणिक मोती
वाजले मॄदंग वाजल्या तालिका प्रत्येक राजस बाळी
नाचत मंडला कारात डौलात तालात तन्मय झाली.
अनेक आरत्यां मधून फाकला तुपाचा सुगंधी धूर
सगळ्यांवरती चढला आगळा कोवळा माझाच सूर
कंकण कंचुकी मंडित दावित सुगौर सरळ भुजा
आरती ठेवून उठले शेवटी करून प्रदोष- पूजा
फिकट झाले रे चांदणे नंतर थांबले आवाज सारे
विझली समई थांबली सनई थांबले सुगंधी वारे
विषण्ण होऊन निघून गेले रे सगळे दांभिक थोर
सगळे जाऊन उरला विशीचा एकच राजस पोर
बोलला हळूच “चढण उतार नंतर नीलार्द्र हवा
संगती जाऊन लोणार तळ्यात बघूया देवीचा दिवा”
“बांधून महाल येथून पाहीन एकटा परत जा तू
परत जा रे तू कुठल्या दूरच्या राजाचा पुत्र वा नातू”
सगळे कळत होते रे नव्हते माझे हे मानस भोळे
बगह्त राहीले मी एकसारखी त्याचे ते लाचार डोळे
फासात फसल्या सावजा वरला होते रे मी एक भाला
सगळी ह्रूदये जाळीत जाणारी होते रे मी एक ज्वाला
कसले गायन माझे ते नुसते अधर कूजीत होते
मांडून देवता माझीच अहंता सारखी पूजीत होते.
नुसते नेटके नाटक होते ते नव्हते मनात कढ
हिअवात जाळीत होते मी कोवळे हिरवे केळीचे फड
अशा या येथून दूरात गेल्या रे विषण्ण सुदीर्घ धापा
समोर पूर्वेच्या या माळावरून विरल्या घोड्यांच्या टापा
लहान लहान होऊन शेवटी बनून एकत्र जाळॆ
क्षितीजा वरल्या प्रकाश कडेत विरले आकार काळे
प्रीतीच्या दानाची कधीच नव्हती केली मी किंचीत फेड
नुसते होते रे मोहीत मानव ह्रूदय हत्येचे वेड
दूरात खोलात तमात लवली व्यथित ही वृक्ष राजी
जिंकत जिंकत हासत नाचली निर्दय अहंता माझी
दक्षिण बाजूच्या गोलार्ध भूमीच्या पल्याड आभाळाखाली
निजली नगरी मिटून नयने ओढून ओढणी काळी
प्रत्येक प्रदोष पूजेला आला तो लाचार अनेकवेळ
प्रत्येक वेळी मी निर्दय मांडीला तोच तो तोच तो खेळ
अनेक दिवस तीच ती याचना डोळ्यांत आणून पाणी
कोरडी राहीले कोरडी हासत मी गीत गंधाची राणी
महाला वर या बांधीत मजले ही वर कंचनी गेली
तहान भूकेची मायेची प्रीतीची नव्हती कदर केली
मूळात होते हे दोनच मजले आणखी बांधले पाच
अनेक ज्योतींच्या भोवती झुलले झुंबरा मधले काच
वाटले होते की उंचात जाऊन तार्यांत करीन वेचा
वाटले होते की तेथून पाहीन दीपक कमल जेचा
सप्तर्षीं समोर मी अंग विक्षेप करीत जाईन नीट
मी सप्त सुरांत गाईन नितांत सुंदर स्वर्गीय गीत
चढले मजले सहाही पण तो दीपक दिसला नाही
चढले सातवा आणिक पाहीले दक्षिण दिशेस बाई!
क्रमशः
Tuesday, July 01, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment