मेहेकर येथे गावाबाहेर एक पडीक मोठा वाडा आहे. तो कंचनीचा महाल या नावाने ओळखला जातो.
त्याबद्दल एक आख्यायीका आहे.
कंचनी ही एक लावण्यवती आणि रूपाचा अहंकार असलेली गणिका. नदीकिनारी तिचा प्रासाद होता. घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते.
पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले देवीचे देऊळ . तिथे जळणारा नंदादीप देवळात न जाता मी सात मजले चढून इथूनच बघेन असा तिचा तोरा होता. त्यासाठी तिने भव्य महाल बांधून घेतला. गर्वात ती एका रात्री एकावर एक मजले चढत गेली आणि सातवा मजला चढली मात्र, देवीच्या कोपाने शीळा होऊन तिथेच खाली कोसळली. तिचे चैतन्य लोपले. अजूनही तिथे रात्री घुंगराचे आवाज ऐकू येतात (असे म्हणतात!)
या कथेवर आधारीत श्रेष्ठ कवी श्री ना घ देशपांडे यांची ही कविता.
साधारण वीस वर्षांपूर्वी मी ती प्रथम वाचली. तिची गेयता आणि माधुर्याने मनावर जी मोहिनी घातली ती आजतागायत कायम आहे!
अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
ऐकले भाषण परंतु नव्हती कुणाची कुठेच खूण
विस्मय भीतीने पथिक बनला पांढरा चांदण्याहून
नकोस घाबरु उगाच पथिका मलाही चैतन्य होते
तुझ्याच सारखे मलाही एकदा यौवन लावण्य होते.
थांबला पथिक किंचीत हालला पिवळा निर्जन माळ
आणिक उठला चांदण्यावरती अस्पष्ट नर्तन ताल
थांबच पथिका एकच घटिका नंतर उतर खाली
ऐक रे पथिका मी होते गणिका दूरच्या मागच्या काळी
श्रावणा मधल्या यामिनी मधली मी एक दामिनी होते
मी एका प्राचीन रहस्य कथेची सुंदर स्वामिनी होते.
सुवेष धारिणी मी मनमोहक कुशल कंचनी होते
मी एका राजाच्या राजस पुत्राची हृदय हारिणी होते.
हातात हिरण्य भोवती अरण्य मी एक लावण्यखणी
वार्याची झुळूक रंगांची झळक मधुर मोहक गाणी
मनाची लहर रात्रीचे प्रहर वीणेचे तरल सूर
कुसुम कोमल सुंदर तनुचा चढता यौवन पूर
विमुक्त वर्तन कुशल नर्तन भोवती नयन जागे
रुपाची अहंता गुंफिले होते रे यांतच जीवन धागे
क्षणैक हासले पांढरे चांदणे थांबला नर्तन ताल
एकट पथिका एकच घटिका थांबव वाटेची चाल
कावरा बावरा बोलला पथिक नाही मी मुळीच राजी
जाऊदे लौकर गह्रात एकटी आहे ना नवरी माझी
एकदा तशीच मी पण होते रे मोहक लावण्य लता
ऐक रे राजसा माझ्याही सुंदर शृंगार साजाची कथा
विमुक्त वेणि अन हसित वदन चंदन चर्चित अंग
वार्यात उठले बघत राहिला पथिक होऊनी दंग
उद्दम सोनेरी आतली मनिषा दाबून आतल्या आत
चुडेल कहाणी होऊन अवाक ऐकत राहीला पांथ
मीच हा बांधला होता रे महाल आता हा ओसाड आहे
याच्या ह्या दक्षिण दाराच्या बाहेर आता मी दगड आहे
दगड नुसता दगड नुसता मातीत मिळत नाही
पाउस पाण्यात वाकडा तिकडा पडला ठायीच्या ठाय़ी
निःशब्द रात्रीत ऐकत बसते होऊन मी भयभीत
पश्चिमेकडच्या या पैनगंगेच्या पुराचे उदास गीत
जातात दुरून सगळे कुणाला काहीच वाटत नाही
उन्हात तापते तरीही आतला आठव आटत नाही
पुनव चांदणे येताच गाते मी रात्रीच्या वार्यात गाणी
लहान आहे रे कहाणी माझी या वार्याच्या झुळूकी वाणी
क्रमशः
Monday, June 30, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सुरेख
सुरेख कविता!!पोस्टल्याबद्दल धन्यवाद.
अवांतर :"एखाद्या वस्तूवरची (किंवा व्यक्तीवरचीही म्हणा हवं तर)ओनरशीप च जर ठेवली नाही तर बरेचसे प्रॉब्लेम्स जास्त इझीली सॉल्व्ह होतात असा माझा सध्याचा नवीन दॄष्टिकोन आहे! त्यामुळे टेक इट इझी असं सांगावेसे वाटते... (लोक इतकं टेंशन का बरं घेतात?)"
मत देत नाही म्हणताना दिलंत की!! प्लीज हलके घ्या हं!
Post a Comment